AmravaticitynewsDhamangaonLatest NewsMaharashtra

चिंचपूरच्या कृषक विद्यालयात एकाच शिक्षकावर शाळेचा कारभार?

७५ विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाल्याचा पालकांचा आरोप; शिक्षक नियुक्तीची मागणी

अमरावती | प्रतिनिधी

धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचपूर येथील कृषक विद्यालयात शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थांनी केला आहे. सुमारे ७५ विद्यार्थी शिक्षण घेत असताना संपूर्ण शाळेचा कारभार केवळ एका शिक्षकावर चालत असल्याचा दावा करण्यात येत असून, तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पालकांच्या म्हणण्यानुसार, शाळा सुरू होऊन अनेक दिवस उलटूनही आवश्यक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित अध्यापन मिळत नसून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पालक आणि ग्रामस्थांनी शाळेला भेट देऊन शिक्षकांची उपलब्धता, अध्यापन व्यवस्था आणि पुढील नियोजनाबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला.

काही पालकांनी असा आरोपही केला की, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांना “ज्या ठिकाणी प्रवेश घ्यायचा असेल तेथे घ्या आणि शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) घेऊन जा,” असे उत्तर देण्यात आले. या आरोपांमुळे पालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामस्थांच्या मते, प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी पालकांना आवाहन करण्यात आले होते. मात्र, आता शिक्षकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अन्यत्र प्रवेश घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

एकाच शिक्षकावर सर्व वर्गांचे अध्यापन, प्रशासकीय कामकाज आणि इतर जबाबदाऱ्या सोपविल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षण विभागाने तातडीने शिक्षकांची नियुक्ती करून परिस्थिती सुधारावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पालक आणि ग्रामस्थांनी दिला आहे. मात्र, या आरोपांबाबत शाळा व्यवस्थापन किंवा संबंधित शिक्षण विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील आव्हानांकडे लक्ष वेधणाऱ्या या प्रकरणाकडे शिक्षण विभाग कोणती भूमिका घेतो आणि शिक्षकांची नियुक्ती कधी केली जाते, याकडे आता पालक आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button