AmravatiamravaticitynewsLatest NewsMaharashtra

अंबापेठेतील चोरीचा काही तासांत उलगडा; आरोपी अटकेत

सिटी कोतवाली पोलिसांची तत्पर कारवाई; चोरीतील आठ ताशे जप्त, ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील अंबापेठ परिसरात घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा सिटी कोतवाली पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावत एका आरोपीला अटक केली आहे. चोरीला गेलेले आठ ताशे जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून सुमारे ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबापेठ परिसरात राहणारे प्रसाद राजेंद्र जगताप यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या घरासमोरील खुल्या शेडमध्ये ठेवलेल्या एकूण नऊ ताशांपैकी आठ ताशे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.

तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संकेत अंगेश घोसले (वय १९) याला ताब्यात घेतले.

पोलिसी चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व आठ ताशे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ४८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सिटी कोतवाली पोलिसांच्या तत्पर आणि प्रभावी तपासामुळे चोरीच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा झाला असून चोरीतील संपूर्ण मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

दरम्यान, शहरातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहतील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button