citynewsLatest NewsMaharashtraYavatmal

नेर तालुक्यात चार महिन्यांच्या चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू; लसीकरणानंतर मृत्यूचा पालकांचा आरोप

आरोग्य विभागाने आरोप फेटाळले; शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

यवतमाळ | प्रतिनिधी

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधीबेडा येथे चार महिन्यांच्या चिमुकलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. लसीकरणानंतर मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला असून या घटनेनंतर संतप्त पारधी समाजाने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू करून सखोल चौकशीची मागणी केली आहे. मात्र, आरोग्य विभागाने हे आरोप फेटाळून लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचा कोणताही प्राथमिक पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजंती पारधीबेडा येथील अंगणवाडीत आरोग्य विभागामार्फत आयोजित लसीकरण शिबिरात संबंधित चार महिन्यांच्या बालिकेला नियमित लस देण्यात आली होती. त्यानंतर रात्री सुमारे दहाच्या सुमारास बालिका झोपली. मात्र, दुसऱ्या दिवशी पहाटे सुमारे चार वाजता आई-वडिलांनी तिला उठविण्याचा प्रयत्न केला असता तिच्याकडून कोणतीही हालचाल होत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यानंतर बालिकेला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर पालकांनी लसीकरणामध्ये झालेल्या कथित त्रुटीमुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

या घटनेनंतर पारधी समाजातील नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाने या आरोपांचे खंडन करत लसीकरणामुळे मृत्यू झाल्याचे कोणतेही प्राथमिक कारण आढळून आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे विभागाकडून सांगण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांच्या आरोपांमुळे आणि आरोग्य विभागाच्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शवविच्छेदन अहवालानंतरच बालिकेच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button