citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपूर ग्रामीण पोलिसांची ड्रग्स माफियाविरोधात मोठी कारवाई

जून २०२६ पर्यंत ३.८३ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; अनेक राज्यांत धाडसत्र, तस्करांना अटक

नागपूर | प्रतिनिधी

महाराष्ट्रात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कामगिरी करत जून २०२६ अखेरपर्यंत तब्बल ३ कोटी ८३ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर गांजा, अफू, एमडी ड्रग्स आणि ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली असून अनेक ड्रग्स तस्करांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेदरम्यान ८१० किलो गांजा, ३४ किलो अफू, ६३९ ग्रॅम एमडी ड्रग्स तसेच ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली. या सर्व अंमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे ३ कोटी ८३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

नागपूर ग्रामीण पोलिसांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओडिशा या राज्यांमध्ये जाऊन ड्रग्स पुरवठादार आणि तस्करांविरोधात धडक कारवाई केली. या मोहिमेत अनेक आरोपींना अटक करून त्यांना महाराष्ट्रात आणण्यात आले आहे.

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी काही गंभीर प्रकरणांमध्ये आरोपींवर मकोका (MCOCA) आणि एमपीडीए (MPDA) यांसारख्या कठोर कायद्यांअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, यावर्षीच्या कारवाईत जप्तीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील कालावधीच्या तुलनेत गांजा जप्तीत ६४३ टक्के, अफू जप्तीत ५८७ टक्के आणि एमडी ड्रग्स जप्तीत तब्बल १,८७३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. ही आकडेवारी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेचे यश अधोरेखित करणारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, नागपूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, ड्रग्स माफियांविरोधातील कारवाया यापुढेही अधिक कठोरपणे सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button