citynewsLatest NewsMaharashtraWardhaWeather Report

आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा

शाळेत शिरले पुराचे पाणी; शैक्षणिक साहित्याचे नुकसान, आठ शेळ्या वाहून गेल्याची भीती

वर्धा | प्रतिनिधी

वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. नरसिंगपूर येथे पुराचे पाणी थेट जिल्हा परिषद शाळेत शिरल्याने शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या पोषण आहाराचे नुकसान झाले. तर नाल्याला आलेल्या पुरात जवळपास आठ शेळ्या वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, त्यापैकी चार शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. बेलोरा परिसरातही नदीला पूर आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

आष्टी तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नरसिंगपूरसह अनेक भाग जलमय झाले. पुराचे पाणी गावातील शाळेत शिरल्याने वर्गखोल्यांमध्ये पाणी साचले आणि शैक्षणिक साहित्याचे मोठे नुकसान झाले. विद्यार्थ्यांसाठी साठवून ठेवण्यात आलेला शालेय पोषण आहारही पाण्यात भिजल्याने त्याचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, नरसिंगपूर शिवारातील नाल्याला आलेल्या पुरात जवळपास आठ शेळ्या वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यापैकी चार शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

बेलोरा शिवारातही नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

मुसळधार पावसामुळे आष्टी तालुक्यात शाळा, पशुपालक आणि शेतकरी अशा सर्वच घटकांना फटका बसला आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे सर्वेक्षण सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, बाधितांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button