citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

पेंचच्या चोरबाहुली पर्यटन द्वाराची विक्रमी भरारी

यंदाच्या हंगामात 21,817 पर्यटकांची भेट; वनविभागाला 72 लाखांचा महसूल, स्थानिक रोजगारालाही मोठी चालना

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या चोरबाहुली पर्यटन द्वाराने यंदाच्या पर्यटन हंगामात नवा इतिहास रचला आहे. 1 ऑक्टोबर 2025 ते 30 जून 2026 या कालावधीत तब्बल 21 हजार 817 पर्यटकांनी या पर्यटन द्वारातून जंगल सफारीचा आनंद घेतला. विक्रमी पर्यटकसंख्येमुळे वनपर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्था आणि रोजगारालाही मोठा हातभार लागला आहे.

30 जून 2026 रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोर क्षेत्रातील जंगल सफारीचा यंदाचा पर्यटन हंगाम अधिकृतपणे संपला. हंगामाच्या अखेरीस चोरबाहुली पर्यटन द्वाराने सर्वाधिक पर्यटकांना आकर्षित करत उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली.

चोरबाहुली परिसरातील नयनरम्य निसर्ग, वर्षभर पाण्याने भरलेले पाणवठे, दाट जंगल आणि सुमारे 21 किलोमीटर लांबीचा पेंच नदीचा किनारा हे पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरले. याशिवाय बोरबन हत्ती कॅम्प आणि परिसरात 12 हून अधिक वाघांचा वावर असल्याने अनेक पर्यटकांना वाघदर्शनाचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. यामुळे या प्रवेशद्वाराची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली.

पर्यटन हंगामात स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ झाला. निसर्ग मार्गदर्शकांना 20 लाख रुपयांहून अधिक मानधन मिळाले, तर जिप्सी चालक आणि मालकांना एकूण 1 कोटी 21 लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. याशिवाय वनविभागाच्या तिजोरीत 72 लाख रुपयांहून अधिक महसूल जमा झाला.

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन 14 नवीन निसर्ग मार्गदर्शक आणि 10 नवीन जिप्सींचा समावेश करण्यात आला. तसेच पर्यटन केंद्रावरील कँटीनची जबाबदारी महिला बचत गटाकडे सोपविण्यात आल्याने स्थानिक महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळाली आहे.

वन्यजीव संरक्षण, पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा प्रभावी समन्वय साधण्यात वनविभागाला यश आले असून, चोरबाहुली पर्यटन द्वार राज्यातील वनपर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे झळकू लागले आहे.

वाघांचे आकर्षण, समृद्ध जैवविविधता, निसर्गरम्य वातावरण आणि स्थानिकांना मिळालेल्या रोजगाराच्या संधी यामुळे चोरबाहुली पर्यटन द्वाराचा यंदाचा हंगाम संस्मरणीय ठरला आहे. आगामी पर्यटन हंगामात पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास वनविभाग आणि स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button