citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur graminramtek

महिला शौचालयात चक्क फ्रिज; आवारात दारूच्या बाटल्या, रामटेकमध्ये खळबळ

रामाळेश्वर वॉर्डातील सुलभ शौचालयाचा धक्कादायक प्रकार; नगरपरिषदेकडून चौकशीचे आश्वासन

रामटेक | प्रतिनिधी

रामटेकमधून सार्वजनिक सुविधेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामाळेश्वर वॉर्डातील सुलभ शौचालयाच्या महिला कक्षात चक्क फ्रिज ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. एवढेच नाही तर शौचालयाच्या आवारात देशी दारू आणि बिअरच्या रिकाम्या बाटल्याही आढळल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

महिला शौचालयात फ्रिज का?

रामटेक नगरपरिषदेच्या रामाळेश्वर वॉर्डातील हे सुलभ शौचालय सार्वजनिक वापरासाठी असून, ते खासगी व्यक्तीला संचालनासाठी देण्यात आल्याची माहिती आहे.

स्वीकृत सदस्य रमेश कारामोरे यांनी या ठिकाणी पाहणी केली असता महिला शौचालयाच्या आत फ्रिज ठेवण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सार्वजनिक वापरासाठी असलेल्या महिला शौचालयात फ्रिज ठेवण्याची परवानगी नेमकी कोणत्या आधारावर देण्यात आली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या

याच शौचालयाच्या परिसरात देशी दारू आणि बिअरच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

सार्वजनिक वापरासाठी असलेल्या शौचालयाच्या आवारात दारूच्या बाटल्या कशा आल्या? या ठिकाणी नेमके काय सुरू होते? याची चौकशी करण्याची मागणी आता होत आहे.

आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

या प्रकारावरून स्वीकृत सदस्य रमेश कारामोरे आणि नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष बिकेंद्र महाजन यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

चौकशीत सत्य समोर येणार?

महिला शौचालयात फ्रिज का ठेवण्यात आला? शौचालयाच्या परिसरात दारूच्या बाटल्या कशा आल्या? या ठिकाणी नेमके काय सुरू होते? आणि या प्रकाराला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित झाले आहेत.

सार्वजनिक सुविधेच्या ठिकाणी समोर आलेल्या या प्रकारामुळे रामटेकमधील नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने चौकशी करते आणि दोषींवर कोणती कारवाई केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सिटी न्यूज | रामटेक

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button