धारणीत पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री रॅकेटचा पर्दाफाश

190 किलो गोवंशाचे मांस, वाहनासह 1.05 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल
धारणी | प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरात पोलिसांनी अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्या रॅकेटविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 190 किलो गोवंशाचे मांस जप्त केले आहे. कुरेशी मोहल्ला परिसरात टाकलेल्या धाडीत कत्तलीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, रोख रक्कम आणि वाहनासह एकूण 1 लाख 5 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार जिल्हाभर अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच मोहिमेअंतर्गत धारणी पोलिसांना ही महत्त्वाची कारवाई करण्यात यश आले.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धारणीतील कुरेशी मोहल्ला परिसरात अवैधरीत्या गोवंश कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.
कारवाईदरम्यान पोलिसांनी शेख समीर शेख कबीर आणि शेख नसीम शेख सुलतान यांच्या ताब्यातील जागेची तपासणी केली. तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात गोवंशाचे मांस विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. पंचनामा करून पोलिसांनी तब्बल 190 किलो गोवंशाचे मांस जप्त केले.
याशिवाय लोखंडी तराजू, वजन काटे, लाकडी ढोका, कुऱ्हाड, सु-या, रोख रक्कम आणि मांस वाहतुकीसाठी वापरले जाणारे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले. जप्त केलेल्या सर्व साहित्याची एकूण किंमत 1 लाख 5 हजार 560 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासादरम्यान आरोपींकडे कत्तल करण्यात आलेल्या जनावरांच्या मालकी हक्काबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा पुरावे आढळून आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.
धारणी पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून या अवैध व्यवसायामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, अमरावती ग्रामीण पोलिसांकडून सुरू असलेल्या अवैध धंदेविरोधी मोहिमेमुळे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये गुन्हेगारी आणि बेकायदेशीर व्यवसायांवर मोठा आळा बसत असल्याचे दिसून येत आहे. धारणीतील या कारवाईनंतर अवैध गोवंश कत्तल आणि मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.



