BuldhanacitynewsLatest NewsMaharashtra

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात! चालक जखमी; मदतकार्य उशिराने पोहोचल्याने संताप

राज्याच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरजवळ भरधाव ट्रेलरचा गंभीर अपघात झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. मात्र, अपघातानंतर मदतकार्य वेळेत न पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केल्याने आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे सुमारे चार वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील मेहकर परिसरात घडला. भरधाव वेगात असलेल्या ट्रेलरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. अपघात इतका भीषण होता की ट्रेलरचे मोठे नुकसान झाले आणि चालक गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर चालक बराच वेळ वाहनात अडकून मदतीसाठी तडफडत होता. मात्र महामार्गावरील आपत्कालीन सेवा, टोल फ्री हेल्पलाइन, ॲम्ब्युलन्स आणि पोलीस मदत यंत्रणा वेळेत घटनास्थळी पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरील आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या दरम्यान मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर खान आणि काही वाहन चालकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला ट्रेलरमधून सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी मदत केली. त्यांच्या वेळेवर केलेल्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

जखमी चालकाला तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर सातत्याने घडणारे अपघात आणि त्यानंतर मदतकार्याच्या प्रतिसादात होत असलेला विलंब यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अपघातानंतर प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना मदतसेवा वेळेत पोहोचत नसल्यास जीवितहानीचा धोका वाढतो. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करावी, तसेच या प्रकरणातील जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button