शिरपूरजवळ थिनर केमिकलच्या ट्रकचा भीषण स्फोट! पलटीनंतर पेटली आग; ट्रक जळून खाक, मोठी दुर्घटना टळली

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शहादा-बऱ्हाणपूर महामार्गावर एक भीषण अपघात घडला असून थिनर केमिकल वाहून नेणारा ट्रक पलटल्याने त्यामध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही क्षणांतच ट्रकने पेट घेतल्याने संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. स्फोटाचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरातील नागरिक घाबरून घराबाहेर आले, तर आगीचे आणि धुराचे लोट दूरवरूनही दिसत होते.
ही घटना शिरपूर तालुक्यातील सावेर फाट्याजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, थिनर केमिकलने भरलेला ट्रक शहादा-बऱ्हाणपूर महामार्गावरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्याच्या कडेला पलटला. ट्रक पलटल्यानंतर त्यामधील ज्वलनशील केमिकलमुळे अचानक मोठा स्फोट झाला आणि क्षणार्धात आग भडकली.
आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक जळून खाक झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनीही सुरक्षित अंतर राखत वाहने थांबवली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग विझविण्यासाठी बराच वेळ लागला. विशेष म्हणजे, अपघातस्थळाजवळच पेट्रोल पंप असल्याने आणखी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.
या भीषण अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने ट्रक चालक आणि क्लिनर यांनी वेळीच वाहनाबाहेर उडी घेतल्याने त्यांचा जीव वाचला. दोघेही सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, अपघातामुळे शहादा-बऱ्हाणपूर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
या घटनेनंतर धोकादायक आणि ज्वलनशील रसायनांची वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. ट्रक नेमका कशामुळे पलटला, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू असून पुढील चौकशीनंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.



