नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’ची धडक! गांजासह तीन आरोपी जेरबंद; लाखोच्या ड्रग्स रॅकेटकडे पोलिसांचा तपास

नमस्कार, आपण पाहत आहात आमचे विशेष वृत्तांकन. नागपुरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. यशोधरानगर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून आरोपींकडून मोठ्या प्रमाणात गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आली असून मुख्य पुरवठादाराचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.
नागपूर शहर पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत यशोधरानगर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. दिनांक 28 मेच्या रात्रीपासून ते 29 मेच्या पहाटेपर्यंत पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत होते.
यावेळी टिपू सुलतान चौक, संघर्षनगर परिसरात निळ्या-जांभळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पद हालचाल करणारे तीन इसम पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष बॅगची तपासणी केली असता एका कापडी पिशवीमध्ये ओलसर हिरवट झाडपत्ती आणि बिया असलेला उग्र वासाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन एक किलोपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपींकडून मोबाईल फोन आणि बॅगसह एकूण 35 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले तिन्ही आरोपी हे तेलंगणा राज्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे.
चौकशीदरम्यान आरोपींनी हा गांजा नागपुरातील शेख शाहरुख नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केल्याची कबुली दिली असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. आरोपी आर्थिक फायद्यासाठी गांजाची खरेदी-विक्री करण्याच्या उद्देशाने हा मुद्देमाल बाळगत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.
नागपुरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.



