नागपुरात बोलण्यात गुंतवून दुकानातून ३६ हजारांची रोकड लंपास; व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

नागपूर शहरातील जुनी कामठी परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बोलण्यात गुंतवून दुकानातून तब्बल ३६ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली असून अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कसार ओली परिसरात ही चोरीची घटना घडली. फिर्यादी अमित रामरतन पैगवार हे आपल्या दुकानात उपस्थित असताना अंदाजे ३५ वर्षीय एक इसम दुकानात आला. निळ्या रंगाचा फुल शर्ट आणि निळी पॅन्ट परिधान केलेल्या या इसमाने दुकानमालकाला बोलण्यात गुंतवून ठेवले.
दरम्यान, दुकानाबाहेर लाल रंगाची साडी नेसलेली अंदाजे ४५ वर्षीय महिला संशयास्पदरीत्या उभी होती. आरोपीने संधी साधत दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेली तब्बल ३६ हजार रुपयांची रोकड नकळत चोरून नेली.
काही वेळानंतर फिर्यादी यांनी काउंटर तपासला असता रोकड गायब असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ जुनी कामठी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोजे साहेब करत आहेत.
दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
नागपूर शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पोलिस आरोपींपर्यंत किती लवकर पोहोचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



