citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात पोलिसांची सिनेमॅटिक अ‍ॅक्शन; पाठलाग करून तीन सराईत गुन्हेगार शस्त्रांसह जेरबंद

नागपूर शहरातून एक मोठी आणि थरारक बातमी समोर येत आहे. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशानंतर शहरात सराईत गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली असून पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करत तीन संशयित गुन्हेगारांना शस्त्रांसह जेरबंद केले आहे.

नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या आदेशानंतर संपूर्ण पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. शहरातील सराईत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी विविध भागांमध्ये विशेष गस्त आणि तपास मोहीम सुरू करण्यात आली आहे.

याच दरम्यान डीबी पथक पाटणकर चौक परिसरात गस्त घालत असताना एका मोटारसायकलवर तीन संशयित तरुण फिरताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांना पाहताच आरोपींनी मोटारसायकल भरधाव वेगाने पळवून नेली.

यानंतर पोलिसांनी कोणतीही वेळ न घालवता थेट आरोपींचा सिनेमॅटिक स्टाईलमध्ये पाठलाग सुरू केला. काही अंतरावर नियंत्रण सुटल्याने आरोपींची मोटारसायकल स्लीप झाली आणि तिघेही रस्त्यावर कोसळले.

याच क्षणी पोलिसांनी तात्काळ घेराव घालत तिन्ही आरोपींना जागेवरच ताब्यात घेतले.

पोलिस चौकशीत आरोपींची ओळख आयुष ऊर्फ मल्ल्या विनोद मेश्राम, अमृत देवराज आणि भोषायत अशी पटली आहे. हे तिघेही जरीपटका आणि इंदोरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच घातक धारदार चाकू जप्त केला आहे.

याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, मोटारसायकलवरून पडल्यामुळे जखमी झालेल्या आयुष ऊर्फ मल्ल्या मेश्राम याच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्याच्यावर पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button