साकोलीत जिवलग मित्रांकडून युवकाची निर्घृण हत्या; किरकोळ वादातून घडला थरारक प्रकार

भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरात मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वाद आणि शिवीगाळीच्या रागातून जिवलग मित्रांनीच एका युवकाची निर्घृण हत्या केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट.
भंडारा जिल्ह्याच्या साकोली शहरालगत गड कुंभली रोडवरील गाव तलाव परिसरात घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाने संपूर्ण साकोली शहर हादरून गेले आहे. बावीस मे रोजी सकाळी तलावाच्या काठावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून नागरिकांच्या अंगावर काटा आला. मृतकाची ओळख निखिल राजकुमार कांबळे, वय 30 वर्षे, रा. मुरपार लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया अशी पटली.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिलच्या छातीवर, मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले होते. हल्ला इतका क्रूर होता की घटनास्थळ पूर्णपणे रक्ताने माखून गेले होते. या घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मनोहर वलथेर, सागर शंकर पारधी, ओमकार सुनिल मेश्राम, कमलेश चुन्नीलाल कुकवास आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मृतक आणि आरोपी हे परस्परांचे जिवलग मित्र होते. मात्र घटनेच्या रात्री किरकोळ वादातून वातावरण तापले. निखिलने केलेली शिवीगाळ आरोपींच्या इतकी जिव्हारी लागली की संतापाच्या भरात त्यांनी धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करत त्याची हत्या केली.
विशेष म्हणजे खून करून पसार झाल्यानंतर आरोपींपैकी एक जण सकाळी घटनास्थळी जमलेल्या गर्दीत उभा राहून मृतदेह पाहत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या थरारक हत्याकांडामुळे साकोली परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मैत्रीचे नाते इतके रक्तरंजित होऊ शकते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून घटनेमागील इतर कारणांचाही शोध घेतला जात आहे.



