महाराष्ट्र-दक्षिण कोरिया भागीदारीतून कौशल्य विकासाला नवे बळ; युवकांना मिळणार जागतिक दर्जाच्या संधी

महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करारांमुळे राज्यातील कौशल्य विकास, तांत्रिक शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला नवे बळ मिळणार आहे. या करारांमुळे महाराष्ट्रातील युवकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत विविध संस्थांमध्ये हे करार करण्यात आले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि दक्षिण कोरियाच्या कोरिया पॉलिटेक्निक्स, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाइफलाँग एज्युकेशन, तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि कोरियातील प्रतिष्ठित संस्थांमध्ये हे सामंजस्य करार झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दक्षिण कोरियाने उद्योग, व्यवसाय आणि कौशल्य विकास क्षेत्रात जागतिक स्तरावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया यांच्यातील या भागीदारीमुळे कोरियाचे उत्कृष्ट कौशल्य आणि प्रगत तंत्रज्ञान भारतात येणार असून त्याचा थेट फायदा भारतीय विद्यार्थ्यांना आणि युवकांना होणार आहे.
भारताची सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील असून हीच देशाची खरी ताकद आहे. या युवा शक्तीचे कुशल मनुष्यबळात रूपांतर करणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या ६६० अब्ज डॉलरची असून ती एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या करारांमुळे उद्योग क्षेत्राला प्रशिक्षित आणि तंत्रज्ञानस्नेही मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच भारतीय तरुणांसाठी जागतिक स्तरावरील रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, दक्षिण कोरियातील अग्रगण्य संस्थांसोबतची ही भागीदारी महाराष्ट्राच्या कौशल्य विकास व्यवस्थेला नवे बळ देईल. आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत आणि उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय आणि कोरिया पॉलिटेक्निक्स यांच्या भागीदारीत महाराष्ट्रात ‘लर्निंग फॅक्टरी’ मॉडेलवर आधारित अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार आहेत. उद्योगांच्या गरजेनुसार प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्था आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर लाइफलाँग एज्युकेशन यांच्या करारातून ‘लाइफलाँग लर्निंग’ म्हणजेच आयुष्यभर शिक्षण आणि कौशल्य वृद्धीला चालना दिली जाणार आहे. बदलत्या तंत्रज्ञानानुसार युवकांना सतत नवे कौशल्य आत्मसात करता यावे यासाठी डिजिटल शिक्षण आणि प्रमाणपत्र प्रणाली विकसित केली जाणार आहे.
रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील कैस्ट संस्थेमधील करारामुळे उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे. या भागीदारीतून महाराष्ट्रातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मास्टर्स आणि पीएचडी शिक्षणासाठी संधी उपलब्ध होणार आहे. तसेच शाश्वत विकास आणि डिजिटल इनोव्हेशन क्षेत्रात संयुक्त संशोधन केंद्रही स्थापन केले जाणार आहे.
महाराष्ट्र आणि दक्षिण कोरिया यांच्यातील हे सहकार्य राज्यातील कौशल्य विकास, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रासाठी नवे पर्व ठरणार असून जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.



