citynewsLatest NewsMaharashtraSatara

फलटण शहरात मध्यरात्री तरसाचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

फलटण | प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यातील फलटण शहर परिसरात सोमवारी मध्यरात्री तरसाचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील महाराजा मंगल कार्यालय परिसरात हा वन्यप्राणी दिसल्याची माहिती समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यालगत एक तरस फिरताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ काही नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरातील रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तरसाचा वावर असल्यामुळे विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी वन विभागाने तातडीने या प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी निकिता बोटकर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “तरस दिसल्यास त्याला हुसकावण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित अंतर राखून तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा,” असे त्यांनी सांगितले.

वन विभागाच्या पथकाने संबंधित परिसरात पाहणी सुरू केली असून तरसाचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा वन्यप्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत शिरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

फलटण शहरासह परिसरात अधूनमधून वन्यप्राण्यांचा वावर दिसून येत असला तरी भरवस्तीत तरस दिसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. वन विभागाने या प्रकरणात तातडीने उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button