अमरावती ग्रामीण पोलिसांचा ड्रग्स माफियांवर मोठा प्रहार; एमडी ड्रग्ससह दोघांना अटक

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ससह दोन आरोपींना अटक केली आहे. मोर्शी पोलिसांच्या या धडक कारवाईत सुमारे 4 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की चांदूरबाजार ते मोर्शी रोडवरून एका वाहनातून अमली पदार्थांची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित मार्गावर नाकाबंदी केली.
दरम्यान, पांढऱ्या रंगाची टाटा फॉर्च्युनर गाडी थांबवून तपासणी करण्यात आली. वाहनातील दोन इसम संशयास्पद आढळल्याने त्यांची झडती घेण्यात आली. तपासणीदरम्यान त्यांच्या ताब्यातून 5 ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी 5 ग्रॅम एमडी ड्रग्स, दोन अँड्रॉइड मोबाईल फोन आणि पांढऱ्या रंगाची टाटा फॉर्च्युनर गाडी जप्त केली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 4 लाख 80 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
या प्रकरणी अब्दुल हफीज अब्दुल मजीद आणि अकील अहमद जमील अहमद या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर्शी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अमली पदार्थांचा पुरवठा साखळी आणि इतर संबंधित आरोपींबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अमरावती ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांविरोधात सातत्याने मोहीम राबवली जात आहे. या कारवाईला त्या मोहिमेतील महत्त्वाचे यश मानले जात आहे.



