citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला; वाहन तपासणीदरम्यान मारहाण, आरोपी अटकेत

नागपूर | प्रतिनिधी
नागपुरात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहन तपासणी आणि चालान कारवाई सुरू असताना एका आरोपीने महिला पोलीस हवालदाराला शिवीगाळ करत मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ही घटना नागपूर शहरातील अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शताब्दी चौक परिसरात घडली. वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार मालती आत्माराम पाल या आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह नियमित वाहन तपासणी आणि चालान कारवाई करत होत्या.

दरम्यान, इन्जमामुल कलीम खान हा आरोपी घटनास्थळी आला आणि त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. आरोपीने महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी केली.

यानंतर आरोपीने आपल्या जवळील बोरीने महिला पोलीस हवालदारांच्या डोक्यावर हल्ला केला. तसेच हातानेही मारहाण करत “पाहून घेण्याची” धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.

घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र उपस्थित पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत तातडीने कारवाई केली.

महिला पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात आरोपी इन्जमामुल कलीम खान याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण आणि धमकी देणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सार्वजनिक ठिकाणी हल्ला झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button