citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

रामटेक गड मंदिराला नवी दिशा? 1500 वर्ष जुन्या ऐतिहासिक मंदिराचा कारभार ट्रस्टकडे जाण्याच्या हालचालींना वेग

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या रामटेक गड मंदिराबाबत मोठी घडामोड समोर येत आहे.
इतिहास, श्रद्धा आणि वारसा जपणारं हे प्राचीन मंदिर आता नव्या व्यवस्थापनाच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मंदिराचा प्रशासनिक आणि धार्मिक कारभार लवकरच ट्रस्टमार्फत चालवण्याच्या हालचालींना वेग आला असून, यामुळे रामटेक परिसरात समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.

सुमारे 1500 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेलं रामटेक गड मंदिर विदर्भातील एक महत्त्वाचं धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळ मानलं जातं.
भगवान श्रीरामांच्या वास्तव्याशी जोडल्या गेलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारशाची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षामुळे मंदिराची अवस्था चिंताजनक बनली आहे.

मंदिरातील भगवान श्रीरामांच्या गर्भगृहाची स्थिती अत्यंत जर्जर झाल्याचं समोर आलं आहे.
याशिवाय मंदिर परिसरात सुरक्षाभिंत, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि संरचनात्मक देखभालीचा गंभीर अभाव असल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात होती.

सध्या मंदिराच्या व्यवस्थापनात सिनियर आणि ज्युनियर भोसले कुटुंबाचा सहभाग असून देखरेखीसाठी उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र वाढत्या समस्या आणि व्यवस्थापनातील अडचणी पाहता स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रश्नावर पुढाकार घेतला आहे.

स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राहुल कोठेकर, हुकुमचंद बडवाईक आणि राहुल गुढरे यांनी एकत्र येत नागपूर येथील चॅरिटी कमिश्नर कार्यालयात मंदिर ट्रस्ट नोंदणीसाठी अर्ज दाखल केला आहे.
बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशाचा आधार घेत ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून संबंधित प्रतिवाद्यांना नोटीसही बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी आता लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रस्ट स्थापन झाल्यास मंदिराच्या जतन, संवर्धन, दुरुस्ती, धार्मिक व्यवस्थापन आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यास गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रामटेक गड मंदिराचा कारभार ट्रस्टकडे गेल्यास हे केवळ व्यवस्थापनातील बदल ठरणार नाही,
तर विदर्भाच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारशाला नवसंजीवनी देणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

आता या निर्णयाकडे रामटेकसह संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले असून,
रामटेक गड मंदिराला नवसंजीवनी मिळणार का, याचा फैसला लवकरच होणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button