पंढरपूर तीर्थक्षेत्राचा ४१५० कोटींचा महासंकल्प! ३० महिन्यांत समग्र विकास पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई/पंढरपूर : राज्यातील प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी तब्बल ४१५०.४६ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक विकास आराखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पुढील ५० वर्षांचा विचार करून पंढरपूर तीर्थक्षेत्राचा विकास येत्या ३० महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मंत्रालयात पार पडलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, वनेमंत्री गणेश नाईक, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान अवताडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंढरपूर हे राज्यातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असून, येथे दरवर्षी आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी वारीच्या काळात लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणींच्या दर्शनासाठी येतात. वाढती भाविकसंख्या, वाहतूक, रस्ते आणि मूलभूत सुविधांचा वाढता ताण लक्षात घेता पंढरपूरचा विकास नियोजनबद्ध आणि भविष्याभिमुख पद्धतीने करणं अत्यावश्यक आहे.
वारकरी आणि भाविकांना स्वच्छ, सुरक्षित, गर्दीमुक्त आणि आध्यात्मिकदृष्ट्या समाधानकारक अनुभव मिळावा, यासाठी पंढरपूरात दर्जेदार, शाश्वत आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट निर्देश देत सांगितले की, विकासकामांमुळे बाधित होणाऱ्या निवासी, व्यावसायिक मालमत्ताधारक आणि भाडेकरूंना तात्काळ योग्य मोबदला देण्यात यावा. तसेच भूसंपादनासाठी आवश्यक निधीही त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा, जेणेकरून निधीअभावी एकही काम रखडणार नाही.
४१५० कोटींच्या आराखड्यात नेमकं काय?
सोलापूर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी बैठकीत सादर केलेल्या प्रस्तावानुसार—
- गर्दी व्यवस्थापनासाठी कॉरिडॉर उभारणी,
- पुरातन मंदिर व मठांचे जतन-संवर्धन,
- बाधितांना व्यावसायिक संधी,
- वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा विकास
यासाठी ७३५.८० कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला.
तसेच—
- नगर प्रदक्षिणा मार्ग विकास,
- चंद्रभागा नदी घाट सुशोभीकरण,
- वाहनतळ व व्यापारी संकुल,
- शहर सुशोभीकरण,
- रस्ते व पूल,
- पालखी तळ विकास
यासाठी १३८७.९१ कोटी रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला.
याशिवाय—
- भूसंपादन,
- पुनर्वसन,
- बाधित इमारतींचा मोबदला
यासाठी २०२६.७५ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला.
अशा एकूण ४१५०.४६ कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्यास शिखर समितीने मंजुरी दिली.
वारकऱ्यांसाठी आधुनिक आणि सुरक्षित पंढरपूर
या आराखड्यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांसाठी आधुनिक, सुरक्षित, सुकर आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध वातावरण निर्माण होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्राचा हा विकास आराखडा केवळ शहर विकासाचा प्रकल्प नसून, तो वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेला आधुनिक पायाभूत सुविधांची जोड देणारा ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
आता ४१५० कोटींचा हा महासंकल्प प्रत्यक्षात किती वेगाने आणि दर्जेदारपणे पूर्ण होतो, याकडे राज्यभरातील वारकऱ्यांचे लक्ष लागले आहे.



