अमरावतीत अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ६ जण ताब्यात

अमरावती शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अवैध जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विलासनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत आरोपींना रंगेहाथ पकडले.
या कारवाईत मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, मोबाईल आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीतील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विलासनगर परिसरात अवैध जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाईची योजना आखत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
या कारवाईदरम्यान आरोपी नामे गोपी पटेल याच्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. छाप्यावेळी एकूण ६ आरोपी जुगार खेळताना पोलिसांच्या हाती लागले, तर २ आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून ६५ हजार ३९० रुपये रोख रक्कम, सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ६ मोबाईल, अंदाजे १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या २ मोटारसायकली तसेच जुगार अड्ड्यावर वापरले जाणारे ३० हजार ६०० रुपये किमतीचे इतर साहित्य जप्त केले.
या कारवाईत एकूण ३ लाख ८५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सध्या सर्व आरोपींविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक रवाना केले आहे.
या कारवाईमुळे अमरावतीत अवैध जुगार व्यवसायावर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. शहरात वाढत्या अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया महत्त्वाच्या मानल्या जात असून, नागरिकांनीही सतर्क राहून पोलिसांना माहिती देणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.



