citynewsJalnaLatest NewsMaharashtra

वालसावंगी बसस्थानकाजवळ विद्युत रोहित्राला भीषण आग; दुचाकी आणि चिकन दुकान जळून खाक, ५ लाखांचे नुकसान

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे बसस्थानक परिसरात आज भीषण आगीची घटना घडली. विद्युत रोहित्राला लागलेल्या आगीत दुचाकीसह चिकनचे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. या घटनेत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वालसावंगी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या १०० केव्ही क्षमतेच्या विद्युत रोहित्राचा इन्सुलिटर अचानक मोठ्या आवाजासह फुटला. त्यानंतर काही क्षणांतच रोहित्राने पेट घेतला आणि आगीने भीषण रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आकाशाला भिडत असल्याचे दृश्य पाहून परिसरातील नागरिकांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.

रोहित्राच्या अगदी शेजारी असलेले शुभम खराटे यांचे चिकनचे दुकान आगीच्या विळख्यात सापडले. या आगीत दुकानातील सुमारे ५० जिवंत कोंबड्या, कुलर, वजनकाटा, खुर्च्या आणि इतर संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. दुकानाशेजारी उभी असलेली दुचाकीही आगीत पूर्णपणे भस्मसात झाली.

या घटनेत एकूण अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. सामाजिक कार्यकर्ते गणेश गाडेकर यांनी तातडीने वीज विभागाशी संपर्क साधून वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना दिली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा शेजारील दुकाने आणि घरेही आगीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता होती.

घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी पंचनामा करून घटनेचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.

दरम्यान, या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त दुकानदार शुभम खराटे यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वालसावंगीतील या भीषण आगीत सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी आर्थिक फटका मोठा बसला आहे. आता शासनाकडून मदतीचा हात कधी पुढे येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button