BuldhanacitynewsCrime NewsLatest NewsMaharashtra

मेहकरमध्ये ४ वर्षांपूर्वीच्या ‘मिसिंग केस’चा थरारक उलगडा; बेपत्ता व्यक्तीच्या खूनप्रकरणी आणखी २ आरोपी अटकेत

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या खुनाचा धक्कादायक उलगडा झाला असून, या प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. त्यामुळे या थरारक खून प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली आहे. चार वर्षे ‘मिसिंग केस’ म्हणून बंद पडलेल्या या प्रकरणाने आता खुनाचे भीषण रूप घेतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सुकळी (ता. मेहकर) येथील विनोद आश्रुबा नवले (वय ३८) हे मागील चार वर्षांपासून बेपत्ता होते. सुरुवातीला त्यांची नोंद बेपत्ता म्हणून करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी नव्याने तपास सुरू केल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०२६ रोजी मेहकर–मोळा रोडवरील जामगाव शिवारातील एका शेतातून विनोद नवले यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. आरोपींनी कट रचून धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली होती. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडण्यात आला आणि त्यावर सिमेंटचा कोबा टाकून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

या प्रकरणात यापूर्वी मुख्य आरोपी सुनील बाजीराव जाधव (वय ३९, रा. सुकळी) आणि सचिन ज्ञानेश्वर उगले (वय ३२, रा. मेहकर) यांना अटक करण्यात आली होती. पोलिस कोठडीत सखोल चौकशीदरम्यान आणखी दोन आरोपींची नावे समोर आली.

यानुसार पवन रामचंद्र घेवंदे (वय २८, रा. मेहकर; सध्या संभाजीनगर, ता. चिखली) आणि अंकुश दत्तात्रय बोडखे (वय ३५, रा. जामगाव, ता. मेहकर) यांना अटक करण्यात आली आहे. या चौघांनी मिळून खुनाचा कट रचून हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मृतदेह बाहेर काढताना उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, वैद्यकीय अधिकारी अमित धांडे, पंच आणि नातेवाईक उपस्थित होते.

या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार करीत असून, तपासात पोलिसांच्या विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या खुनाचा उलगडा झाल्याने मेहकर तालुक्यात खळबळ उडाली असून, या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी तपासातून समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button