अमरावतीत एमडी ड्रग्स रॅकेटवर गुन्हे शाखेचा मोठा प्रहार; 3.12 कोटींचा मुद्देमाल जप्त, फरार आरोपी जेरबंद

अमरावतीत अंमली पदार्थांच्या वाढत्या जाळ्यावर गुन्हे शाखेने मोठा घाव घातला आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक 112/2026 अंतर्गत गुन्हे शाखेने धडक कारवाई करत एमडी मॅफेडॉन ड्रग्स रॅकेटमधील फरार आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईनंतर अमरावतीतील अंमली पदार्थांच्या साखळीचा आणखी मोठा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहर गुन्हे शाखेने 8 मार्च 2026 रोजी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली होती. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून तब्बल 2 किलो 80 ग्रॅम एमडी मॅफेडॉन पावडर जप्त करण्यात आली होती. या घातक अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 3 कोटी 11 लाख 85 हजार रुपये इतकी असून, त्यासोबत एक दुचाकी वाहनही जप्त करण्यात आले होते. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 3 कोटी 12 लाख 60 हजार रुपये इतकी आहे.
तपासादरम्यान आरोपींनी हे अंमली पदार्थ मुंबईहून अमरावतीत आणल्याची कबुली दिली होती. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची व्याप्ती वाढवली.
दरम्यान, 23 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने सुफियान नगर परिसरात सापळा रचत फरार आरोपी अब्बास कुरेशी आणि सकीब कुरेशी यांना अटक केली. हे दोघे आरोपी आपल्या नातेवाईकांच्या घरी येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींवर यापूर्वीही अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे दाखल आहेत. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही 27 एप्रिल 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार आणि आर्थिक साखळीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.
अमरावतीत वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या जाळ्याला पोलिसांनी मोठा धक्का दिला असला, तरी ही बाब समाजासाठी गंभीर इशारा आहे. तरुण पिढीला ड्रग्सच्या विळख्यातून वाचवण्यासाठी पोलिसांसोबतच पालक आणि समाजानेही सतर्क राहण्याची गरज आहे.



