Amaravti GramincitynewsLatest NewsMaharashtra

रोहनखेडमध्ये स्मशानभूमीवरून वाद; अंत्यसंस्कारालाच अडथळा, ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

अमरावती जिल्ह्यातील रोहनखेड गावातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एकमेव स्मशानभूमीच्या वापरावरून वाद निर्माण झाला असून, अंत्यसंस्कारासाठी अडथळे निर्माण होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत न्यायाची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहनखेड गावात २१ एप्रिल रोजी एका मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारावेळी काही व्यक्तींनी स्मशानभूमीत अडथळा निर्माण केला. त्यामुळे अंत्यसंस्कार प्रक्रिया काही काळ ठप्प झाली आणि मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली.

गावातील ही एकमेव स्मशानभूमी असल्याने, “जर येथेही अंत्यसंस्कार करू दिले जात नसतील, तर मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार नेमके कुठे करायचे?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे गावात भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. निवेदनात त्यांनी भारतीय संविधानाच्या कलम २१चा दाखला दिला आहे. “प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्कार होण्याचाही अधिकार आहे,” असे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.

ग्रामस्थांनी स्मशानभूमीवरील अडथळे तात्काळ दूर करण्याची, अंत्यसंस्कारावेळी पोलिस संरक्षण देण्याची आणि भविष्यात असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, हा प्रश्न तातडीने सोडवला गेला नाही, तर गावात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. सध्या संपूर्ण गावाचे लक्ष जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले असून, प्रशासन या संवेदनशील प्रश्नावर काय तोडगा काढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button