७ वर्षांनंतर भारतात पुन्हा इराणी तेलाची एन्ट्री; दोन महाकाय टँकर किनाऱ्यावर दाखल

नवी दिल्ली : जवळपास सात वर्षांनंतर इराणमधून कच्च्या तेलाची भारतात पुन्हा आयात सुरू झाली असून, दोन मोठे तेलवाहू टँकर भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर दाखल झाले आहेत. जहाज-ट्रॅकिंग माहितीनुसार ही महत्त्वाची घडामोड समोर आली आहे.
‘फेलिसिटी’ नावाचा अतिविशाल तेलवाहू टँकर रविवारी उशिरा रात्री गुजरातमधील सिक्का किनाऱ्याजवळ दाखल झाला. या जहाजामध्ये सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल असून, ते मार्चच्या मध्यात इराणमधील खार्ग बेटावरून लोड करण्यात आले होते.
याचवेळी ‘जया’ नावाचा दुसरा टँकर ओडिशातील पारादीप किनाऱ्याजवळ पोहोचला. या टँकरमध्येही जवळपास तितक्याच प्रमाणात कच्चे तेल असून, ते फेब्रुवारीच्या अखेरीस खार्ग बेटावरून रवाना झाले होते.
विशेष म्हणजे, अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढण्यापूर्वीच हे तेल लोड करण्यात आले होते. अमेरिकेने अलीकडेच दिलेल्या एका महिन्याच्या निर्बंध सवलतीमुळे (sanctions waiver) ही खेप भारतात पोहोचू शकली आहे. या सवलतीचा उद्देश जागतिक तेलपुरवठ्यातील अडथळे कमी करणे आणि किमती नियंत्रणात ठेवणे हा होता.
दरम्यान, पारादीप बंदर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनद्वारे चालवले जाते आणि त्यांनी या सवलतीअंतर्गत किमान एक खेप खरेदी केल्याची पुष्टी केली आहे. तर सिक्का परिसर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारत पेट्रोलियमसाठी महत्त्वाचे केंद्र आहे.
यापूर्वी ‘पिंग शुन’ नावाचा टँकर सुमारे ६ लाख बॅरल तेल घेऊन वाडिनारकडे निघाला होता, मात्र पेमेंट समस्यांमुळे त्याला मार्गातच चीनकडे वळवण्यात आले.
दरम्यान, अमेरिका-इराण तणाव पुन्हा वाढल्याने अमेरिकेने इराणी बंदरांवर नाकेबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे भविष्यातील तेलपुरवठ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे.
सात वर्षांनंतर भारतात दाखल झालेली ही इराणी तेलाची खेप ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वाची मानली जात असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.



