वाशिममध्ये इंधन टंचाईचं संकट; ‘नो स्टॉक’मुळे शेती ठप्प, शेतकरी अडचणीत

वाशिम : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या तीव्र टंचाईमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा पूर्णपणे संपल्याने ‘नो स्टॉक’चे फलक झळकत आहेत, तर दुसरीकडे शेतीची कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पंप मालकांनी वेळेवर पैसे भरून इंधनाची ऑर्डर दिली असतानाही पुरवठा होत नसल्याचा आरोप केला जात आहे. अकोला जिल्ह्यातील गायगाव येथील डेपोतून इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ही टंचाई निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असताना डिझेलअभावी ट्रॅक्टर, जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्री बंद पडली आहेत. नांगरणी, मशागत यांसारखी महत्त्वाची कामे रखडल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.
याशिवाय, मजुरांनाही काम मिळेनासे झाले असून त्यांच्या रोजीरोटीवरही परिणाम झाला आहे. वाहनधारक आणि पेट्रोल पंप चालकांमध्येही प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून गायगाव डेपोतून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा येणाऱ्या शेती हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इंधन टंचाईमुळे थांबलेली शेती… आणि अडचणीत आलेला शेतकरी… आता प्रशासन किती लवकर उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



