युद्धविरामानंतरही सोनं-चांदीच्या दरात मोठी उसळी; आठवड्यात सोनं १९१० तर चांदी १०,००० रुपयांनी महाग

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अनिश्चिततेचा परिणाम अजूनही सोनं-चांदीच्या दरांवर दिसून येत आहे. सध्या दोन आठवड्यांसाठी युद्धविराम जाहीर झाला असला, तरीही मौल्यवान धातूंच्या किमतीत चढ-उतार कायम आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोनं तब्बल १९१० रुपयांनी महागलं असून २२ कॅरेट सोन्याच्या दरातही १७५० रुपयांची वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दर सुमारे १,५२,९९० रुपयांवर पोहोचला आहे, तर मुंबईत तो १,५२,८४० रुपयांवर विकला जात आहे. आठवड्याच्या शेवटी सराफा बाजारात सोन्याच्या भावात आणखी वाढ होत प्रति तोळा १,५५,३०० रुपयांचा स्तर गाठला.
चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. केवळ एका आठवड्यात चांदी १०,००० रुपयांनी महागली असून सध्या प्रति किलो दर २,६०,००० रुपयांवर पोहोचला आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी चांदीत ३,८०० रुपयांची वाढ नोंदवली गेली.
आंतरराष्ट्रीय बाजारातही या दोन्ही धातूंमध्ये तेजी दिसून येत आहे. सोन्याचा स्पॉट दर प्रति औंस ४,७७७.१७ डॉलरवर असून चांदीचा दर ७५.९१ डॉलर प्रति औंस आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात चांदीने ४ लाख रुपयांचा उच्चांक गाठल्याने बाजारातील अस्थिरता स्पष्ट होते.
दरम्यान, मुंबई, कोलकाता, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १,४०,१०० रुपये प्रति तोळा आहे, तर २४ कॅरेट सोनं १,५२,८४० रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईमध्ये मात्र दर थोडे अधिक असून २४ कॅरेट सोनं १,५४,१०० रुपये आणि २२ कॅरेट सोनं १,४१,२६० रुपयांवर व्यवहारात आहे.
सोनं-चांदीच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहक खरेदीपासून दूर राहत असल्याचं चित्र असून, आगामी काळात जागतिक परिस्थिती स्थिर झाल्यासच दरात स्थैर्य येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



