Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

डुलकी ठरली धोकादायक! नागपूर–जबलपूर महामार्गावर कार उलटली; थोडक्यात बचाव

नागपूर : नागपूर–जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर आज दुपारी एक भीषण अपघात घडला. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, मोठा अनर्थ टळला आहे.

ही घटना पवनी ते चोरबाहूली दरम्यान जुन्या चिंधाई माता मंदिराजवळ दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील मनोजकुमार रमेशप्रसाद तिवारी (वय ४०) हे जबलपूरहून नागपूरमार्गे हैदराबादकडे कारने प्रवास करत होते. त्यांच्या सोबत पत्नी सुधाकुमारी या देखील होत्या.

प्रवासादरम्यान चालकाला अचानक डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगामुळे कार रस्त्याच्या कडेला घसरून तब्बल १० ते १५ फूट दूर जंगलात जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की कार पूर्णपणे पलटी झाली होती.

अपघातानंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या अपघातात दोघांनाही कोणतीही दुखापत झाली नाही.

प्राथमिक तपासात चालकाला आलेली झोप हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

वाहन चालविताना थकवा किंवा झोप येत असल्यास प्रवास टाळावा, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. एक क्षणाची दुर्लक्षही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button