BhandaracitynewsLatest NewsMaharashtra

भंडाऱ्यात ‘गॅस घोटाळा’ उघड! OTP न देता सिलेंडर डिलिव्हरी दाखवून सबसिडी लाटल्याचा आरोप

भंडारा जिल्ह्यात गॅस वितरण व्यवस्थेतील एक धक्कादायक गैरप्रकार समोर आला असून, सिलेंडर बुक करूनही ग्राहकांना प्रत्यक्षात गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कागदोपत्री डिलिव्हरी दाखवून ग्राहकांच्या नावावर सबसिडी लाटली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एचपी गॅस सिलेंडर बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असल्याचे उघड झाले आहे. अनेक ग्राहक जेव्हा बुक केलेला सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीकडे जातात, तेव्हा त्यांना “तुमचा सिलेंडर आधीच डिलिव्हर झाला आहे” असे सांगून परत पाठवले जाते.

विशेष म्हणजे, सिलेंडर डिलिव्हरीसाठी आवश्यक असलेला OTP ग्राहकांनी दिलेला नसतानाही, त्यांच्या खात्यातून सिलेंडर वितरित झाल्याची नोंद दिसत आहे. त्यामुळे हा केवळ तांत्रिक बिघाड नसून, काळाबाजारासाठी रचलेला सुनियोजित घोटाळा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एका बाजूला जिल्ह्यात गॅसचा तुटवडा जाणवत असताना, दुसऱ्या बाजूला अशा बनावट डिलिव्हरी दाखवून सामान्य नागरिकांच्या हक्कावर डाका टाकला जात आहे. या प्रकारामुळे विशेषतः महिलांमध्ये संतापाची लाट उसळली असून, “सिलेंडरच मिळत नसेल तर स्वयंपाक कसा करायचा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, तालुका पुरवठा विभागाने या प्रकरणी केवळ ‘सूचना दिल्या’चे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात कारवाईचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे या घोटाळ्यामागे नेमके कोण आहे? दोषींवर गुन्हे कधी दाखल होणार? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

या प्रकारामुळे भंडाऱ्यातील नागरिक आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी गॅस एजन्सींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

📺 तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा… पाहत राहा — सिटी न्यूज

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button