७ वर्षांच्या निरागस मुलीवर ४० वर्षीय व्यक्तीने केले अत्याचार

पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मोशी परिसरात एका ७ वर्षांच्या निरागस मुलीवर शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ एप्रिल रोजी संध्याकाळी आरोपीने मुलीला फूस लावत आपल्या घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीने मुलीला जीवे मारण्याची धमकी देत कोणालाही काही सांगू नकोस, अशी भीती दाखवली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने ही बाब दुसऱ्या दिवशीपर्यंत कुणालाही सांगितली नाही.
दरम्यान, ३ एप्रिल रोजी सकाळी आरोपीने पुन्हा मुलीला घरात नेऊन अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून येणारे संशयास्पद आवाज ऐकून मुलीची आई आणि नातेवाईकांनी खिडकीतून पाहिले असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करत पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस अंतर्गत भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी रामू कुंजल निसाद याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.



