नांदेडमध्ये ‘लाईव्ह’ सूडाचा थरार! रुग्णालयातच हल्ला; पोलिसांसमोर कायद्याची पायमल्ली

नांदेड | प्रतिनिधी
नांदेड शहरात गँगवॉरनंतर आता सूडाच्या भावनेतून थेट रुग्णालयात हल्ला झाल्याने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच हा धक्कादायक प्रकार घडल्याने कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दोन दिवसांपूर्वी नांदेडमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये अर्जितसिंग चव्हाण याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण असतानाच आता त्या प्रकरणाने आणखी भयावह वळण घेतले आहे.
माहितीनुसार, अर्जितसिंग चव्हाण याच्या भावाने रुग्णालयात घुसून कथित मारेकऱ्यावर खंजिराने हल्ला केला. हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत घडल्याची बाब विशेष धक्कादायक मानली जात आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये आरोपीवर संतापाच्या भरात सपासप वार करताना दिसत आहे. पोलिसांसमोरच कायद्याची पायमल्ली होत असल्याचे चित्र या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
या घटनेनंतर नांदेड शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. गुन्हेगारांसोबतच सामान्य नागरिकदेखील कायदा हातात घेत असल्याचे चित्र समोर येत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
दरम्यान, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अर्जितसिंग चव्हाण यांच्या भावाला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून, या घटनेमागील सर्व पैलू उघड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नांदेडमध्ये सलग घडणाऱ्या गँगवॉर, सूड आणि हिंसक घटनांमुळे गुन्हेगारीचा ग्राफ वाढत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच हल्ला होत असेल, तर सामान्य नागरिक किती सुरक्षित आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नांदेडमध्ये कायद्याचं राज्य प्रस्थापित होणार की सूडाचं वातावरण अधिकच बळावणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.



