Accident NewsLatest NewsPune

पुण्यात दुर्दैवी घटना! बास्केटबॉल स्टँड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदुरी येथे असलेल्या नामांकित तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. बास्केटबॉल खेळताना स्टँड अचानक कोसळून द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विशाल वर्मा या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये काही विद्यार्थी बास्केटबॉल खेळत होते. याचवेळी अचानक बास्केटबॉलचा स्टँड कोसळून तो थेट विशाल वर्माच्या अंगावर पडला. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.

घटनेनंतर जखमी अवस्थेत विशालला तातडीने तळेगाव येथील मायमर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण कॅम्पसमध्ये भीती आणि शोककळा पसरली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांनी संस्थेच्या सुरक्षेच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या निलंबनाची मागणी करत आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

घटनेची माहिती मिळताच आंबी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून सध्या तपास सुरू आहे. नेमकी घटना कशामुळे घडली, स्टँडची स्थिती कशी होती याचा शोध घेतला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कॅम्पसमध्ये पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, संस्थेचे प्राचार्य संजीत कनूंगो यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

ही घटना केवळ एक अपघात नसून शैक्षणिक संस्थांमधील सुरक्षेच्या व्यवस्थांवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button