मेहकर तालुक्यात भीषण अपघात: सैलानी भाविकांच्या टेम्पोला अपघात, २ ठार तर १० जण गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने झडप घातली. नांद्रा धांडे परिसरात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
आज सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, सैलानी भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने अचानक रस्त्यावर उलटला. अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन भाविकांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे अफसान शरीफ बागवान आणि रेहान सत्तार बागवान अशी आहेत. तर अपघातात एकूण दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. माजी आमदार संजय रायमुलकर यांनीही सकाळी ७ वाजल्यापासून शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपस्थित राहून जखमींच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात असले, तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.



