वाशिममध्ये इंधन टंचाईच्या अफवा: नागरिकांची साठेबाजी, रिसोडमध्ये पंप कोरडे

वाशिम जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवांनी सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अफवांमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याकडे वळले असून, अनेक पेट्रोल पंप काही तासांतच कोरडे पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रिसोड शहरात तर पेट्रोल संपल्याने काही पंपांवर अंधाराचे चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात इंधन संपणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. यावर विश्वास ठेवत वाहन चालक पेट्रोल पंपांवर गर्दी करत असून, वाहनांच्या टाक्या फुल भरून घेण्याबरोबरच कॅन आणि इतर कंटेनरमध्येही इंधन साठवले जात आहे.
या अतिरेकामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होत असून, खरोखर गरज असलेल्या नागरिकांना इंधन मिळण्यात अडचणी येत आहेत. दरम्यान, तज्ज्ञांनीही याबाबत इशारा दिला आहे. ४० अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानात वाहनाची टाकी पूर्ण भरून ठेवणे धोकादायक ठरू शकते. पेट्रोलचा विस्तार होऊन आग लागण्याचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रिसोडमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर झाली असून, पेट्रोल आणि डिझेल पूर्णतः संपल्यामुळे काही पंप चालकांनी विद्युत दिवेही बंद केले आहेत. त्यामुळे परिसरात अंधार पसरलेला दिसत असून नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण अधिकच वाढले आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे. अनावश्यक साठेबाजी टाळल्यास कृत्रिम टंचाई टाळता येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सध्या अफवा आणि घाबरून केलेली साठेबाजी यामुळेच जिल्ह्यातील परिस्थिती बिकट होत असून, संयम आणि जबाबदारीने वागणे हीच काळाची गरज असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.



