अमरावतीत देहव्यापारावर पोलिसांची धडक कारवाई; दोन महिलांची सुटका, आरोपी ताब्यात

अमरावती (प्रतिनिधी):
अमरावती शहरात देहव्यापाराच्या संशयावरून पोलिसांनी मोठी कारवाई करत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत धाड टाकली. या कारवाईत एका महिलेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई पार पडली. दामिनी पथकातील पोलीस निरीक्षक दिप्ती ब्राम्हणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघाली गावंडे आणि पोलीस कॉन्स्टेबल पूजा सपकाळ यांनी पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला.
फ्रेजरपुरा हद्दीतील मंगलधाम रोड, चित्रा कॉलनी परिसरात एका घरात देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंच आणि बोगस ग्राहकाच्या मदतीने छापा टाकला. या कारवाईदरम्यान एका महिलेकडून आर्थिक फायद्यासाठी इतर महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच ग्राहक आणणाऱ्या एका पुरुषालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना वेश्याव्यवसायासाठी येथे बोलावले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. घटनास्थळावरून एकूण २७ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, महिला, विद्यार्थी आणि बालकांवरील छळ, छेडछाड किंवा रोडरोमियो प्रकार आढळल्यास नागरिकांनी ११२, १०९१ आणि १०९८ या हेल्पलाईन क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अमरावती शहरात अशा गैरप्रकारांवर पोलिसांची कडक नजर असून, अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.



