भंडाऱ्यात पेट्रोलसाठी झुंबड; साकोलीत पंपावर किलोमीटर लांब रांगा, अफवा की व्यवस्थेचा बोजवारा?

भंडारा जिल्हा मधून एक धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. एकीकडे प्रशासन इंधन मुबलक असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात नागरिक पेट्रोलसाठी पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत.
साकोली तालुका येथील सानगडी परिसरातील अशोका पेट्रोल पंपावर आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी उसळली. “पेट्रोल संपेल” या भीतीने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पंपावर धाव घेतली.
यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या असून, परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आणि काही ठिकाणी गोंधळाचे वातावरणही निर्माण झाले.
दरम्यान, अशोका पेट्रोलियमचे डीलर अशोक लिचडे यांनी स्पष्ट केले की पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही आणि साठा पुरेसा उपलब्ध आहे. तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम असून गर्दी कमी होताना दिसत नाही.
या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, ही परिस्थिती अफवांमुळे निर्माण झाली आहे की व्यवस्थेतील त्रुटीमुळे, याबाबत संभ्रम कायम आहे.
सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी संयम बाळगणे आणि प्रशासनाने स्पष्ट व पारदर्शक माहिती देणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.



