अमरावतीत उपयोगात नसलेल्या व धोकादायक केबल्स हटविण्याची महानगरपालिकेची मोहीम सुरू

अमरावती – शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे इंटरनेट सेवा, केबल नेटवर्क आणि इतर तांत्रिक सुविधा वाढल्या असल्या तरी, अनेक ठिकाणी खराब किंवा लोंबकळणाऱ्या केबल्समुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकाने उपयोगात नसलेल्या व धोकादायक केबल्स हटविण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे.
महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील केबल व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीनंतर संबंधित केबल ऑपरेटर, इंटरनेट सेवा पुरवठादार व संस्थांना संयुक्त नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन न झाल्यामुळे आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
महानगरपालिकेच्या पथकांकडून शहरातील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, शाळा परिसर तसेच गर्दीच्या भागांमध्ये पाहणी केली जात आहे. लोंबकळणाऱ्या व धोकादायक केबल्स हटविण्याचे काम वेगाने सुरू असून, काही ठिकाणी अत्यंत खराब अवस्थेतील केबल्स तात्काळ काढून टाकण्यात आल्या आहेत, तर उर्वरित ठिकाणी सुरक्षित व्यवस्थापन केले जात आहे.
निरीक्षणादरम्यान अनेक भागांमध्ये केबल्स नियमबाह्य पद्धतीने बसविण्यात आल्याचे आढळले. रस्त्यांवर व सार्वजनिक ठिकाणी लटकणाऱ्या केबल्समुळे वाहनचालक, पादचारी तसेच आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले.
महानगरपालिकेच्या या मोहिमेमुळे शहराचे सौंदर्यीकरण होण्यास मदत होणार असून रस्त्यांवरील अस्ताव्यस्तता कमी होईल. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संबंधित सेवा पुरवठादारांना अंतिम इशारा देत नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात नियमभंग आढळल्यास दंडात्मक व कायदेशीर कारवाई होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या व्यापक कारवाईमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत शहरातील अनियमित केबल व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



