रामनवमी निमित्त अमरावतीत मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश

अमरावती शहरात रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मांस विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिका कडून याबाबत अधिकृत सूचना देण्यात आली आहे.
दिनांक २६ मार्च २०२६ (गुरुवार) रोजी रामनवमी निमित्त शहरातील कत्तलखाने आणि मांस विक्रीची सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासनाच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या आदेशानुसार सर्व संबंधित आरोग्य अधिकारी, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मांस विक्रेत्यांना याबाबत सूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, संबंधित दिवशी कोणतीही पशुहत्या किंवा मांस विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
जर आदेशाचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात कळवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, या आदेशाची अंमलबजावणी झाल्याचा अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करावा, असेही नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे रामनवमीच्या दिवशी शहरात धार्मिक वातावरण राखण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.



