नागपूरमध्ये १७ वर्षीय युवकावर चाकू हल्ला; एक आरोपी अटकेत, दुसरा फरार

नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत हसनबाग परिसरात ही धक्कादायक घटना घडली. मोठी मस्जिदसमोर एका १७ वर्षीय युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच रात्रपाळी अधिकारी सविता यादव, तपास पथकाचे प्रदीप काईट आणि त्यांचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोहोचल्यावर जखमी शहबाज खान (वय १७) याला स्थानिक नागरिकांनी उपचारासाठी Government Medical College and Hospital येथे दाखल केल्याचे समोर आले.
पोलिसांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता, शहबाजवर डाव्या हातावर आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. तपासात किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याचे उघड झाले आहे. आरोपी दानिश शेख आणि शहबाज यांच्यात काही वेळ आधी वाद झाला होता.
याच वादातून बशीर अखिल शेख (वय २४) याने चाकूने हल्ला करत शहबाजला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी बशीर शेख याला १६ मार्च रोजी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा आरोपी दानिश शेख सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
ही कारवाई एसीपी सक्करदरा विभाग आणि डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
नागपूरमध्ये किरकोळ वादातून झालेला हा जीवघेणा हल्ला चिंताजनक असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



