गणेशपेठ बस स्थानक परिसरात दोन हॉटेल मालकांमध्ये मध्यरात्री राडा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानक परिसरात ग्राहकांवरून दोन हॉटेल मालकांमध्ये मध्यरात्री जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बस स्थानकासमोर असलेल्या अंबिका रेस्टॉरंट आणि स्वाद हॉटेल यांच्यात ग्राहकांना हॉटेलमध्ये आणण्यावरून वाद निर्माण झाला. ग्राहकांच्या वाहनाच्या पार्किंगवरून हा वाद सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणातील पहिली तक्रार जय श्रीराम दालचाचा मालक ऋतिक राजू डामरे यांनी गणेशपेठ पोलिसांकडे दिली. तक्रारीनुसार, सोमवारी मध्यरात्री ते जेवणाचे पार्सल आणण्यासाठी जात असताना अंबिका रेस्टॉरंट आणि स्वाद हॉटेलसमोर काही जणांमध्ये भांडण सुरू असल्याचे त्यांनी पाहिले.
यावेळी स्वाद हॉटेलचा मालक विकास बांगलवार, त्याचा मित्र निशांत सावंत तसेच इतर काही जण आणि अंबिका रेस्टॉरंटचे मालक रामनरेश पांडे, नितेश पांडे, अनुज पांडे आणि दिनेश चाटप यांच्यात जोरदार वाद सुरू होता.
वाद चिघळल्यानंतर अंबिका रेस्टॉरंटमधील काही लोकांनी शिवीगाळ करत विकास बांगलवार आणि निशांत सावंत यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांना तात्काळ मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी परस्पर गुन्हे नोंदवत सहा जणांविरुद्ध कारवाई केली आहे. या घटनेमुळे गणेशपेठ बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करत आहेत.



