इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती; अमरावतीत एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी

इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता भारतातही जाणवू लागल्याची चर्चा सुरू आहे. गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो या भीतीमुळे अमरावती शहरात गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Iran आणि Israel यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर होत असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतात गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
याच भीतीमुळे अमरावती शहरात आज सकाळपासून विविध गॅस एजन्सीबाहेर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अनेक नागरिक घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी एजन्सीसमोर रांगा लावत असल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, काही गॅस एजन्सी चालकांशी संवाद साधला असता त्यांनी स्पष्ट केले की, अमरावती शहरात सध्या फक्त कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे. घरगुती वापरासाठी लागणारा एलपीजी गॅसचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊन अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन एजन्सी चालकांनी केले आहे. मात्र सध्याचा साठा किती दिवस पुरेल याबाबत निश्चित सांगता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर अफवांमुळे निर्माण झालेली भीती आणि त्यातून वाढलेली नागरिकांची गर्दी हे चित्र आज अमरावती शहरात पाहायला मिळाले.



