रिहानाच्या घरावर गोळीबार; बेवर्ली हिल्समध्ये खळबळ

लॉस एंजेलिस : हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना हिच्या घरावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉस एंजेलिस मधील बेवर्ली हिल्स परिसरात ८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एका ३० वर्षीय महिलेने गायिकेच्या घरावर तब्बल १० गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार झाला त्या वेळी रिहाना घरामध्येच उपस्थित होती. सुदैवाने या घटनेत तिला किंवा घरातील इतर कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
वृत्तानुसार, आरोपी महिला पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये आली होती. तिने कारच्या आतूनच रिहानाच्या घरावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंटचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची तपासणी सुरू केली.
पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपास शोधमोहीम राबवून एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक चौकशीत याच महिलेने गोळीबार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
३८ वर्षीय रिहाना सध्या तिचा पार्टनर रॉकी आणि तीन मुलांसह या घरात राहते. गोळीबाराची घटना घडली त्यावेळी ती घरातच होती.
दरम्यान, या घटनेनंतर रिहानाच्या चाहत्यांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ती सुरक्षित असल्याचे समजताच चाहत्यांनी दिलासा व्यक्त केला.
गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून लॉस एंजेलिस पोलीस डिपार्टमेंट या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या घटनेबाबत रिहानाने अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.



