अनिल अंबानींवर ईडीची मोठी कारवाई; रिलायन्स पॉवरशी संबंधित १२ ठिकाणी छापेमारी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उद्योगपती अनिल अंबानीं यांच्याविरोधात पुन्हा मोठी कारवाई सुरू केली आहे. रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्या आणि व्यक्तींवर ईडीने आज पहाटे मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली. मुंबईतील रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित तब्बल १२ ठिकाणी ईडीच्या पथकांनी धाड टाकल्याने उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स पॉवर विरोधातील तपासासाठी ईडीची सुमारे १५ पथके आज पहाटेपासून शोध मोहिमेत सहभागी झाली. या पथकांनी कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या निवासस्थानी तसेच कार्यालयीन ठिकाणी छाडाछडती केली. आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू असून संभाव्य आर्थिक अनियमिततेबाबत तपास केला जात आहे.
या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि व्यवहारांची माहिती तपासली जात असल्याचे समोर येत आहे. दरम्यान, या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, छापेमारी सुरू असतानाही रिलायन्स पॉवर च्या शेअर्समध्ये सुमारे २ टक्क्यांची वाढ होऊन ते २३ रुपयांवर पोहोचले. तसेच रिलायन्स इन्फ्राच्या शेअर्समध्येही ४ टक्क्यांहून अधिक वाढ होत ते ९४.२० रुपयांवर व्यवहार करत असल्याचे दिसून आले.
ईडीची ही कारवाई प्रामुख्याने मुंबई आणि हैदराबाद येथील ठिकाणांवर केंद्रित असल्याची माहिती मिळाली आहे. तपासात अडथळे येऊ नयेत म्हणून काही ठिकाणांचे पत्ते अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत.
यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्येही ईडीने मुंबईतील पाली हिल परिसरातील अनिल अंबानी यांच्या ‘अॅबोड’ या निवासस्थानी कारवाई केली होती. त्यानंतर आता कंपनीशी संबंधित १२ ठिकाणी पुन्हा छापेमारी करण्यात आली आहे.
कथित आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंगच्या व्यापक चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात येत असून रिलायन्स पॉवरमधील संशयास्पद निधी हस्तांतरण आणि व्यवहारांचा तपास ईडीकडून सुरू आहे. पुढील काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



