पारशिवनी तालुक्यात भीषण अपघात; पुलावरून कार कोसळून आठ जखमी

दोघांची प्रकृती चिंताजनक; नागपूरला हलवले
पारशिवनी (नागपूर), दि. 20 फेब्रुवारी : नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात महादुला–चिंचोली मार्गावरील पुलावरून कार खाली कोसळल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
सावळी ग्रामपंचायत हद्दीत घटना
सावळी ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या महादुला–चिंचोली रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात घडला. कार पुलावरून जात असताना चालकाचे अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट पुलाखाली कोसळली.
नऊ जणांचा प्रवास; नागरिकांची तत्पर मदत
अपघातग्रस्त कारमध्ये चार महिला, चार पुरुष आणि दीड वर्षांचा एक चिमुकला असा एकूण नऊ जण प्रवास करत होते. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसांच्या मदतीने सर्व जखमींना बाहेर काढण्यात आले.
जखमींवर उपचार सुरू
जखमींना तातडीने पारशिवनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर पारशिवनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तपास सुरू
या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताचे नेमके कारण काय, चालकाचे नियंत्रण का सुटले, याचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



