पुणे मनपाची पहिलीच सभा ठरणार वादळी! दोन महिला नगरसेविका थेट जेलमधून येणार; आंदेकर टोळीच्या दोघीही सासू-सून विजयी

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनंतर आता सत्तेचे समीकरण आणि पहिल्या सर्वसाधारण सभेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत प्रभाग क्रमांक २३ मधून विजयी झालेल्या दोन महिला नगरसेविका. राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) निवडून आलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघीही चक्क तुरुंगातून महापालिकेच्या सभेला हजर राहणार आहेत.
कोल्हापूर कारागृहातून पुण्याच्या सभेत एन्ट्री
पुण्यातील गाजलेल्या आयुष कोमकर हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि त्यांची सून सोनाली आंदेकर सध्या कोल्हापूर कारागृहात आहेत. त्यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली आणि विजयही मिळवला.
- नियम काय सांगतो? नवनिर्वाचित सदस्यांना शपथ घेणे आणि सभेला उपस्थित राहणे कायदेशीररीत्या आवश्यक असते.
- प्रशासकीय तयारी: ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यासाठी नगरसचिव कार्यालयाने पत्राचा ड्राफ्ट तयार केला आहे. हे पत्र कारागृह प्रशासनाला पाठवून त्यांना पोलीस बंदोबस्तात सभेला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली जाणार आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचा बोलबाला
पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत आंदेकर, कोमकर आणि मारणे टोळीशी संबंधित नातेवाईकांनी मोठ्या प्रमाणावर निवडणूक लढवली. गुंड बंडू आंदेकरांच्या या दोन्ही नातेवाईकांनी (लक्ष्मी आणि सोनाली) विजय मिळवून गुन्हेगारी आणि राजकारणाचे अजब समीकरण पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. याशिवाय गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे, बापू नायर आणि दीपक मानकर यांचा मुलगा हर्षवर्धन मानकर यांच्या उमेदवारीमुळे ही निवडणूक आधीच चर्चेत होती.
महायुतीत बिघाडी?
भाजप आणि राष्ट्रवादी हे सत्तेत एकत्र असतानाही दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने पुण्याच्या राजकारणात नवी ठिणगी पडली आहे. राष्ट्रवादीने आपला उमेदवार मागे न घेतल्यास काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ९ फेब्रुवारीला होणाऱ्या या सभेत प्रत्यक्ष मतदानावेळी काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



