कर्मचारी कुटुंबाप्रमाणे विद्यापीठ कार्यासाठी स्वत:ला वाहून घेतात – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

विद्यापीठातील सेवानिवृत्त कर्मचा-यांना समारंभपूर्वक निरोप
अमरावती – (दि. 01.01.2026) : विद्यापीठातील कर्मचारी आपल्या कुटुंबाप्रमाणे स्वत:ला विद्यापीठ कार्यासाठी वाहून घेत निष्ठा व प्रामाणिकपणे काम करतात, असे गौरवोद्गार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी काढले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील कर्मचा-यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी आयोजित कर्तव्यपूर्ती सोहळ्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नियंत्रण अधिकारी वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, कार्यकारी अभियंता श्री शशिकांत रोडे, सहा. कुलसचिव श्री रविंद्र सयाम, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री अजय देशमुख, सत्कारमूर्ती उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम, सौ. घोम, श्री मोहन डाबरे, सौ. डाबरे, श्री प्रफुल्ल ठाकरे, सौ. ठाकरे उपस्थित होते.
कुलगुरू म्हणाले, विद्यापीठ हे एक कुटुंब आहे व कर्मचारी निष्ठेने आपली कामे प्रामाणिकपणे करतात. विद्यापीठाचा जो निसर्गरम्य परिसर झाला आहे, त्याचे श्रेय विद्यापीठाच्या उद्यान विभागाचे आहे. वृक्षारोपण, संवर्धन हे मोठे कार्य असून यासाठी उद्यान विभागाने मोठे परिश्रम घेतले आहे. कर्मचा-यांचा कामाचा असलेला उत्साह, निष्ठा ही मोठी जमेची बाजू असून, उद्यान विभागाचे अधीक्षक श्री अनिल घोम यांना उद्यानश्री असे संबोधले तर ते वावगे होणार नाही, असेही कुलगुरू म्हणाले व तीनही सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या शुभकामना दिल्या. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी श्री अनिल घोम, श्री मोहन डाबरे, श्री प्रफुल्ल ठाकरे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. तर सौ. घोम, सौ. डाबरे व सौ. ठाकरे यांचा सौ. प्रज्ञा बोंडे यांनी साडी-चोळी व कुंकवाचा करंडा देवून सत्कार केला.
प्रमुख अतिथी डॉ. भैय्यासाहेब मेटकर म्हणाले, विद्यापीठाचे कर्मचारी अतिशय नम्रपणे व प्रामाणिकपणे कामे करतात. कर्मचा-यांची उणीव भासत असली तरीही त्याचा बाऊ न करता कर्मचा-यांचे सातत्याने आपल्या संस्थेप्रती असलेले प्रेम, निष्ठा, प्रामाणिकपणा आजही कायम आहे, असे सांगून त्यांनी सर्व सत्कारमूर्तींना पुढील भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सत्कारमूर्ती श्री अनिल घोम, श्री मोहन डाबरे, श्री प्रफुल्ल ठाकरे यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव सांगतांना सहकारी कर्मचा-यांकडून मिळालेल्या प्रेम, स्नेहभावाबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच सीए. पुष्कर देशपांडे, श्री रविंद्र सयाम, श्री शशिकांत रोडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे श्री अजय देशमुख यांनीही मनोगतातून सत्कारमूर्तींना उज्ज्वल भविष्याच्या व दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात.
विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे, उपाध्यक्ष डॉ. अविनाश असनारे, कोषाध्यक्ष श्री राजेश एडले यांनी सत्कारमूर्तींचा भागभांडवलाचा धनादेश व पुस्तक देऊन सत्कार केला. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील प्रा. प्रफुल्ल खराटे यांनी श्री मोहन डाबरे यांचा सपत्नीक सत्कार केला. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉ. प्रफुल्ल गवई यांनी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांना वृक्षरोपटे भेट दिले. विद्यापीठाचा परिसर आणखी हिरवागार व्हावा, म्हणून वृक्षारोपणासाठी डॉ. गवई यांनी 524 वृक्ष भेट दिले. राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, सूत्रसंचालन भांडार विभागाचे अधीक्षक डॉ. धनंजय पाटील यांनी, तर आभार श्री संजय ढाकुलकर यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच सत्कारमूर्तींच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



