AmravatiLatest NewsMaharashtra

अमरावतीत तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न

अमरावती, ३० डिसेंबर २०२५:

भावी पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या मोहिमेचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील तालुकास्तरीय पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांसाठी ‘तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था’ कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.

शिक्षण मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या ‘तंबाखू मुक्त पिढी: शाळांसाठी आव्हान’ या विषयाच्या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये उपशिक्षणाधिकारी, महानगरपालिका शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी शिक्षण, शाळा केंद्र प्रमुख आणि विषय साधन व्यक्ती उपस्थित होते.

कार्यशाळेत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत समाजात आणि विशेषतः लहान मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला. शाळा व शैक्षणिक संस्था केंद्र व राज्य शासनाच्या निकषांनुसार तंबाखूमुक्त करण्यासाठी रॅली, पोस्टर, घोषवाक्ये, कविता व पथनाट्ये यांसारखे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसेच, शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री करणे दंडात्मक गुन्हा असून, १८ वर्षांखालील मुलांना तंबाखू विकणे किंवा तसे करण्यास भाग पाडणे हा कठोर शिक्षेस पात्र गुन्हा आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती प्रत्येक तालुक्यातील शाळांकरिता विशेष पोस्टर्स, बॅनर्स आणि बोर्ड्सचे वाटप करत आहे.

सदर प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षक डॉ. मंगेश गुजर यांनी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या निकषांची माहिती दिली, तर मंगेश गायकवाड यांनी ‘तंबाखू नियंत्रण कायदा २००३’ बाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत शिक्षण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, संभाजी नगर यांनी संयुक्त सहभाग नोंदवला. प्रशिक्षित अधिकारी आता शाळा स्तरावर मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन व पर्यवेक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button