प्रा. सतीश हागे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी

खामगाव :- वाणिज्य विषयाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक सतीश शालिग्राम हागे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांची आचार्य (Ph.D.) पदवी जाहीर झाली आहे. ते गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी असून त्यांनी “बुलढाणा व अकोला जिल्ह्यातील फोटोग्राफी व्यवसायाचे व्यवस्थापकीय अध्ययन” या विषयावर विद्यापीठाला शोधप्रबंध सादर केला होता. प्रा. सतीश हागे यांनी M.Com, M.Phil. व B.Ed. या पदव्या प्राप्त करून विविध विषयांतील सखोल ज्ञान संपादन केले आहे. फोटोग्राफी क्षेत्रातही त्यांनी अनेक नामांकित छायाचित्रकारांसोबत कार्य करून व्यावसायिक अनुभव मिळविला आहे. त्यांनी 2006 ते 2008 या कालावधीत भारतीय स्टेट बँक, शाखा जळगाव जामोद येथे सेवा बजावली. त्यानंतर 2009 ते 2014 या काळात कला व वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकाल येथे अध्यापन करताना वाणिज्य विभागप्रमुख तसेच संगणक विभागप्रमुख म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या.
2014 पासून फोटोग्राफीची विशेष आवड असल्याने ते पूर्णवेळ फोटोग्राफी व्यवसायात कार्यरत असून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे. फोटोग्राफी विषयावर संशोधन झाले असले, तरी प्रत्यक्ष फोटोग्राफर व्यवसायिकांवर केंद्रित संशोधन करणारे ते महाराष्ट्रातील कदाचित पहिलेच संशोधक मानले जात आहेत. फोटोग्राफी व्यवसायावर स्वतंत्र पुस्तक प्रकाशित करण्याचा त्यांचा मानस असून यामुळे या क्षेत्राला शैक्षणिक अधिष्ठान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या संशोधन कार्यासाठी गो. से. महाविद्यालय, खामगाव येथील संशोधन मार्गदर्शक डॉ. जयंत पोरे यांचे प्रा. सतीश हागे यांना मोलाचे व अनमोल मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



