लातूर जिल्ह्यात वाढत्या थंडीचा तुरीच्या पिकांना लाभ; शेतशिवारात फुलांचा बहर

८ डिसेंबर २०२५ – लातूर
राज्यात थंडीने चांगलीच वाढ पकडली असून या वाढत्या गारव्याचा लातूरच्या औसा तालुक्यातील शेतशिवारावर सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. तुरीच्या पिकाला अनोखा फुलांचा आणि शेंगांचा बहर आल्याने शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद फुलला आहे.
औसा तालुक्यातील बुधोडा, सेलू, खुंटेगाव, आलमला आणि उंबडगा या गावांमध्ये गेल्या काही दिवसांत तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. या थंडीमुळे तुरीच्या पिकाला विलक्षण असा बहर आला असून संपूर्ण परिसर निसर्गाच्या सौंदर्याने खुलून दिसत आहे.
बुधोडा परिसरात शेतकरी टोमॅटो, तूर, उडीद, फुलकोबी, पानकोबी, सोयाबीन अशी विविध पिके घेतात. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरले होते.
पण आता तुरीच्या पिकाला लागलेल्या पिवळसर फुलांचा सुगंधी बहर आणि काही ठिकाणी दिसणाऱ्या दाट शेंगांमुळे शिवार पुन्हा जिवंत झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी तूरबाग उजळून निघाली असून काही झाडे शेंगांच्या ओझ्याने वाकल्यासारखी दिसत आहेत.
गेल्या काही महिन्यांच्या अडचणी विसरून शेतकरी दिलासा व्यक्त करत असून, सोयाबीनच्या नुकसानीची भर तुरीच्या पिकातून भरून निघेल, अशी अपेक्षा करत आहेत. तुरीच्या सुधारित जातींची पेरणी केल्यामुळे यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यताही कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
औसा तालुक्यातील या सकारात्मक घडामोडींमुळे शेतकऱ्यांमध्ये आशावाद पुन्हा बळावत आहे.



